देऊळगाव राजाजवळ भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू; तर जुन्नरमध्ये स्कॉर्पिओ घाटात कोसळून २ जणांचा मृत्यू.

देऊळगाव राजा: (ABDnews) 14 मार्च: राज्यात गेल्या काही तासांत झालेल्या दोन भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. शेगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला देऊळगाव राजा येथे अपघात झाला ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका घटनेत जुन्नर येथील बदगी घाटात स्कॉर्पिओचा अपघात होऊन दोन जण ठार झाले.

अंबड तालुक्यातील रोहणवाडी येथील काही भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी बोलेरो वाहनाने शेगाव येथे जात होते. जालन्याहून शेगावकडे जात असताना देऊळगाव राजा येथे बोलेरो कार आणि भाविकांच्या ट्रकची धडक झाली. हा अपघात आज (१४ मार्च) पहाटे ५:३० च्या सुमारास घडला. हा अपघातात इतका भीषण होता की त्यामध्ये ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना देऊळगाव राजा व जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व जखमी हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहणवाडी गावचे रहिवासी आहेत.

बदगीच्या घाटात स्कॉर्पिओ कोसळून २ ठार

जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावच्या हद्दीतील बदगी गावच्या घाटावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात नवनाथ पोपट यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल खंडू हुलवळे यांचा उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जांबळे गावचे रहिवासी आहेत.

अपघातातील वाहन टेकडीवर अडकल्याने दोघांनाही बाहेर काढण्यासाठी खामुंडी येथील तरुणांना मोठी धडपड करावी लागली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, नरेंद्र गोराणे, आशा भवरी, संदीप सोमवंशी, सचिन डोळस, खंडेराव रहाणे, राजेंद्र बनकर घटनास्थळी पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!