लोकं आत्महत्या का करतात.?

Suside: दरवर्षी जगात 7 लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण, त्यापेक्षा कित्येक जास्त पटीने लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 14 ते 20 वर्ष या वयोगटातील आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं मुख्य कारण आहे.

प्रत्येक आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना निर्माण झालेली असते. यामागे काही वैद्यकीय कारणं सुद्धा असतात.

लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो?

एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणे अथवा त्याने आत्महत्येची कल्पना करणे, याला मानसोपचार तज्ज्ञांच्या भाषेत ‘सुसाइट आयडिएशन’ म्हणतात.

मनात आत्महत्येचा विचार येण्यास केवळ एकच कारण कारणीभूत नसतं. आत्महत्ये-सारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी घडलेली घटना केवळ निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणे हा एकच मार्ग आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दिसत असतो.

दिलशाद खुराना (Mpower) हे मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईनच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, “माझ्या जीवनात आता काहीच उरलेलं नाहीये. मला माझे आयुष्य संपवणे हा एकच मार्ग उरलेला आहे. लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना ‘सुसाइट आयडिएशन’ असे म्हणतात.”

नैराश्याचं शेवटचं पाऊल म्हणजे आत्महत्या असाच सर्वसाधारण समज आहे. याचे कारण म्हणजे डिप्रेशनमध्ये (नैराश्य ग्रस्त) असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वांत अधिक आहे. तर मग आत्महत्येचा विचार हा नैसर्गिक असतो? की यामागे वैद्यकीय कारणं आहेत?

मानोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी म्हणतात की, “आत्महत्येचा विचार केव्हाही नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजीकल झालेल्या बदलामुळे लोकांना त्यांचे जीवन व्यर्थ वाटू लागते. त्यामुळे, मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. आत्महत्येच्या 90 टक्के प्रकरणामध्ये मानसिक आजार हे एक प्रमुख कारण आहे.” डिप्रेशन किंवा नैराश्यामध्ये असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहात असतात. जणू काही त्यांनी नकारात्मक विचारांचाच चष्मा घातलेला असतो.

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमधील लोकांत धोक्याची लक्षणं कोणती?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अवहालानुसर, साल 2019 मध्ये 77 टक्के आत्महत्या अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये घडल्या आहे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणं आढळतात.

▪️डिप्रेशन किंवा नैराश्य
▪️मानसिक स्थितमध्ये चढ-उतार
▪️सततची चिंता किंवा अस्वस्थता
▪️पूर्वी ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं
▪️मनामध्ये सतत नकारात्मक विचार येणे
▪️भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना करणे.

मनात आत्महत्येचा विचार आला तर काय करावं?

नकारात्मक विचार तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांपुरता मर्यादित असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन आत्महत्येचे विचार वाढतात.

मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहे. ज्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणे टाळतात. यावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयामार्फत मानसिक आरोग्यावर समुपदेशनाकरीता ‘हितगुज’ ही हेल्पलाईन कार्यरत आहे. याचे महत्त्व सांगताना विभागप्रमुख डॉ. अजिता नायक म्हणतात की, “सुसाईड प्रतिबंध हेल्पलाईन रुग्णांशी संपर्काचा पहिला टप्पा आहे. आत्महत्येचा विचार मनात आल्यावर, थेट मानसोपचार-तज्ज्ञांकडे जाणे शक्य नसते. अशावेळी या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्यामुळे नक्कीच मदत मिळू शकते.”

तज्ज्ञ सांगतात की, मनात आत्महत्येचा विचार आल्यावर मानसिक आरोग्या संबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना अवश्य भेटा.

मानत आत्महत्येचा विचार का येतो, आणि हा विचार किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे.

डॉ. धर्माधिकारी पुढे म्हणतात की, “आत्महत्येचा विचार येता क्षणी मानसिक आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती स्वत:साठीच मोठा धोका असते. व ती स्वत:लाच हानी पोहोचू शकतात. त्यामुळे तात्काळ योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहेत.”

तुम्हाला कोणी आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितलं तर काय करावे?

जर का तुमच्या जवळच्या व्यक्तीने ‘मला आत्महत्या करावी वाटते.’ असे सांगितलं, तर काय करायचं? या परिस्थितीला कसे हाताळायचं? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

मानसिक आजारानेग्रस्त असलेल्या व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वांत जास्त महत्त्वाची असते. मानसशास्त्रज्ञ दिलशाद खुराना याबाबत काही टीप्स देतात.

▪️शांतपणे समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यावे. त्याला मन मोकळं करण्याकरुटा धीर द्या.
▪️शांत रहा, लगेच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका.
▪️ समोरच्या व्यक्तीची व्यथा समजून ती मान्य करा.
▪️लगेच ही काही मोठी समस्या नाही असं म्हणून अस्वीकार करू नका.
▪️त्यांची भावना समजून घ्या.
▪️कुटुंबियांनी आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींवर आपला कोणताही निर्णय लादू नये. त्यांना आपले विचार मांडण्यासाठी योग्य जागा दिली पाहिजे.
▪️किशोरवयीन मुलांसोबत मानसिक आजार किंवा आत्महत्या या विषयावर चर्चा करावी. यात संकोच करू नये.
▪️शिवाय तज्ज्ञ म्हणतात, कुटुंबियांनी विचार न करता चुकीचा सल्ला देऊ नये किंवा थोडं बाहेर फिरून ये, दोन दिवस सुट्टी घे, आराम कर असे कॅज्युअल सल्ले देऊ नयेत.

विशेष सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या साहाय्याने मानसिक आजारांवर उपचार शक्य असून यासाठी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणे दिसल्यास खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

▪️हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212

▪️सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय –1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

▪️इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820

▪️नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000

▪️विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!