मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या; पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप..

▪️तब्बल नऊ तास मृतदेह पोलिस ठाण्यात होता पडून..

▪️मयतावर छत्तीस तासानंतर उरकले अंत्यविधी..

पोलिसांनी मारहाण करून अपमानित केल्याने मनस्थिती दुखावलेल्या पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील विवाहित तरुणाने टोकाची भूमिका घेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड ता. अंबड येथे सोमवारी ता. १३ सकाळी उघडकीस आली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट पाचोड पोलिस ठाण्यात आणून ठेवल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्धात जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परिसरामध्ये प्रचंड तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते. मोहन गोरख राठोड वय (२४) रा. दाभरूळ ता. पैठण असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे.

मयत मोहन गोरख राठोड

सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाण्यामध्ये दाखल होऊन संतप्त नातेवाइकांना शांत करत दोषी विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर तब्बल नऊ तास पोलिस ठाण्यामध्ये पडून राहिलेला मृतदेह रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर मंगळवारी ता. १४ पंचनामा झाल्यानंतर दुपारी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात मयतावर तब्बल छत्तीस तास उलटल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. वातावरण शांत झाल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी, की, दाभरूळ ता. पैठण येथील मोहन राठोड यांच्या विरुध्दात त्यांच्या पत्नी रोशनी राठोड हिने पत्तीसह सासरकडील सहा मंडळी विरुध्दात पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात भांदवी कलम ४९८ अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी ता. ११ रोजी मोहन राठोडसह घरच्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतल्यानंतर पोलिस कर्मचारी पवन चव्हाण, नांदवे यांनी नातेवाईकांसमोर मारहाण करून अपमान केल्याची भावना मोहन राठोडला अस्वस्थ करून गेली. शिवाय पन्नास हजाराची मागणी देखील करण्यात आल्याचा आरोप करत त्या स्थितीत त्याने सोमवारी ता. १३ सकाळी घराबाहेर पडून थेट जामखेड ता. अंबड जामुवंत मंदिर जवळील डोंगरावर जाऊन सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्या केली.

पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच मोहनने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे नातेवाईकांच्या भावना तीव्र होऊन संतप्त जमावाने सोमवारी दुपारी ३ वाजता मृतदेह घेऊन पोलीस ठाणे गाठून दोषी पोलिसांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करून घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने वातावरण चिघळण्याचे संकेत मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरगोजे हे आपल्या फौजफाट्यासह पाचोड पोलिस ठाण्यात धाव घेतली.

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल आणि पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेहावर शवविच्छेन करुन अंत्यविधी केल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार योग्य ती कारवाई केली जाण्याचे आश्वासन देऊनसुद्धा नातेवाईक राजी झाले नाही. नातेवाईकांच्या आडमूठ धोरणापुढे पोलीसही काही काळ हतबल झाल्याचे पाहावयास मिळाले.

मृतदेह फुगायला लागल्यानंतर नातेवाईकानी पोलिसांनी दिलेले आश्वासन मान्य करून रुग्णवाहिकेला पाचारण करून पोलिस ठाण्यासमोर आणून ठेवलेला मृतदेह तब्बल नऊ तास उलटल्यानंतर रात्री १२ वाजता पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणून ठेवला. मंगळवारी ता. १४ सकाळी पंचनामा करून घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दाभरूळ येथे शोकाकुळ वातावरणात मयत मोहन राठोड यांच्यावर दुपारी साडेतीन वाजता अंत्यविधी करण्यात आले. तूर्तास याप्रकरणी पाचोड ता. पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन पुढील तपास जिल्हा पोलिस अधिक्षक ग्रामीण मनिष कलवनिया, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुरेश माळी हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!