वैजापूरच्या शिवसेना आमदारावर भावजयीचे गंभीर आरोप! गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागितली इच्छामरणाची परवानगी..
वैजापूरच्या राजकारणामध्ये कौटुंबिक वादामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदारावर त्यांच्या भावजयीने गंभीर आरोप केले असून, गृहमंत्र्यांना पत्र लिहून त्यात इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आमदार रमेश बोरणारे आपल्याला वारंवार धमकावून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे, आणि हा त्रास आता असह्य झाल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे.
जयश्री दिलीपराव बोरणारे असे पत्र लिहिणाऱ्या महिलेचे नाव असून, त्यांनी यापूर्वी सुद्धा रमेश बोरणारे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात आ. बोरणारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
आ. रमेश बोरणारे यांच्या होणाऱ्या त्रासामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असे पत्र जयश्री यांनी वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना पाठवले आहे.
नेमकं प्रकरण काय…
अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला आ. रमेश बोरणारे यांचे चुलत बंधू व त्यांची पत्नी जयश्री यांनी हजेरी लावून कराड यांचा सत्कार केला होता. नेमकी हीच बाब आ. रमेश बोरणारे यांच्या जिव्हारी लागली. आणि त्यांच्यासह 10 जणांनी या दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणामुळे भाजपही आक्रमक झाली आहे. आ. रमेश बोरणारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे.