जळगाव औरंगाबाद महामार्गा वरील गोळेगाव-लिहाखेडी जवळ धावत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट..
औरंगाबाद जळगाव महामार्गावरील गोळेगाव – लिहाखेडी परिसरात एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज बुधवारी (दि. ४ मे) रोजी घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत गाडी पूर्ण जळाली असून सुदैवाने कोणतीही जीवनहानी झालेली नाही..
प्राप्त माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यामधील पानवडोद बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान त्यांची कार ( एमएच २० एफ वाय ५०९९) घेऊन ड्रायवर आपल्या मित्राबरोबर औरंगाबाद- जळगाव महामार्गावरून सिल्लोडकडे जात असताना गोळेगाव जवळील साई ढाबा नजीक असलेल्या वळण रस्त्यावर अचानक या कारला आग लागली.
गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालक अमीनने लगेच गाडी थांबवली आणि तत्परता दाखवत सर्वजण खाली उतरले. परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून स. पो. नि. अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
राज्यात ३० एप्रिलपासून पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी भर उन्हात वाहनातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.