भयंकर..! एकादशीला मृत्यू यावा या उद्देशाने वृद्ध महिलेने पेटवून घेतले..
औरंगाबाद: अध्यात्माची खूप आवड असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेने संपूर्ण अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २४ रोजी उशिरा रात्री औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर (११ वी योजना) परिसरामध्ये घडली असून कावेरी भास्कर भोसले असे या आत्महत्या केलेल्या वृद्ध महीलेचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, कावेरी भास्कर भोसले या वृद्ध महिलेला आध्यात्माची प्रचंड आवड होती. दिवसभर त्या हरिपाठ, भजन, पारायण, पोथी वाचन यातच रममान असायच्या रविवारी कामिका एकादशी होती त्यामुळे सुद्धा त्यांनी नित्यनेमप्रमाणे हरिपाठ आणि भजन केले अन् वरच्या रूममध्ये झोपायला गेल्या. पौराणिक अभ्यास असलेल्या आजीने एकादशीला मृत्यू यावा अशी इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती.
रविवारी रात्री १० च्या सुमारास त्यांनी हरिपाठ करून कुटुंबियांना आता तुम्ही झोपा असे सांगून त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर त्या वृध्द महिलेने संपूर्ण अंगाला गावरान तूप लावून बाथरूममध्ये जात देवाचा धावा करून स्वतःला पेटवून घेतले. बाथरूममध्ये जाण्यापूर्वी त्यांनी हाताला सुती कापडाच्या चिंध्या गुंडाळून त्यावर गावरान तूप ओतले होते. चींध्यावर तूप टाकलेले असल्यामुळे कापडाने लगेचच पेट घेतला होता.
आईच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे मुलगा आणि सुनेने वरच्या मजल्यावर धाव घेत कावेरीबाई यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कावेरीबाई वर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून सततच्या आजारपणाचा सुद्धा कावेरीबाई कंटाळल्या होता, आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुध्दा सुरू होता, त्यामुळे सुध्दा कावेरीबाईंनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे