ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल फोडून सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास.
कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर बायपासवर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून चोरट्यांनी विदेशी मद्य, संगणक आणि रोख रक्कम असा तब्बल २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
अंकुश फकीरराव जाधव यांचे कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर द्वारकामाई बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. १३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जाधव, हॉटेल मॅनेजर गुलाब काळे आणि वेटर प्रशांत तुपे हे हॉटेल बंद करून गेले. यावेळी हॉटेलमध्ये विदेशी मद्य, गल्ल्यामध्ये ३३ हजार रोख रक्कम होती.
दुसऱ्या दिवशी दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ड्राय डे असल्याने हॉटेल बंद होते. दि १५ रोजी सकाळी साडे आठ वाजता हॉटेल उघड्यावर त्यांना हॉटेलचा पाठीमागचा दरवाजा उघडा दिसला. कुलूप तोडल्याचा संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांना २ लाख २२ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, संगणक, होम थिएटर व रोख रक्कम असा एकूण २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिनेश जाधव करीत आहेत.