कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याकडून 1 हजार कोटींचा दावा ..

औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या दिलीप लुणावत नामक पित्याने आपल्या मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून एक हजार कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार या बरोबरच लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे पार्टनर बिलगेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिलीप लुणावत यांच्या कन्या डॉ. स्नेहल लुणावत ह्या नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी येथील महाविद्यालयात होत्या. डॉ. स्नेहल यांनी दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती, आणि 1 मार्च 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या दाव्यानुसार कोरोना प्रतिबंधित लसी या संपूर्णता सुरक्षित असल्याचे म्हटले होते, तसेच सरकारने आणि लस बनवणाऱ्या कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस 100% सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर लसीच्या दुष्परिणामामुळे मुलीचा मृत्यू झाला झाला असून खोट्या आणि चुकीच्या दाव्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या एइएफआय समितीने कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे स्नेहल हीचा मृत्यू झाला असे मान्य केल्याचाही या याचिकेत उल्लेख केला आहे. त्यामुळेच इतर लोकांचे प्राण वाचावेत व आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आपण ही याचिका दाखल केली असल्याचे दिलीप लुणावत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!