औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..
औरंगाबाद-पुणे या मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यामधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याची तयारी करण्यात आली आहे.
डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चामुळे एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बससाठी कंत्राट सुद्धा देण्यात आले असून, लवकरच या इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाकडे येणार असून तेथूनच राज्यातील प्रमुख शहरांना या इलेक्ट्रिक बसेसचे वाटप करण्यात येणार आहे.
सद्य स्थितीत औरंगाबाद -पुणे या मार्गावर जवळपास १८ शिवशाही बस धावत आहेत. आता औरंगाबाद -पुणे महामार्गावर लवकरच इलेक्ट्रिक बस धावताना दिसणार आहे. पुणे विभागाच्या सुद्धा २० इलेक्ट्रिक बस धावणार असल्याने या मार्गावर केवळ इलेक्ट्रिक बसेसची सेवा चालू असणार आहे. जुलै वा ऑगस्ट महिन्यामध्ये किमान २० इलेक्ट्रिक बसेस औरंगाबादेत दाखल होतील, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
याठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये इलेक्ट्रिक बसेस करीता चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या स्टेशनमध्ये एका वेळेस १५ बस चार्जिग होण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आणि एक बसच्या चार्जिंग करीता किमान ६ तासाचा अवधी लागणार आहे.
औरंगाबाद विभागाला जवळपास २० इलेक्ट्रिक बस येणार असून प्रवाशांना औरंगाबादहून पुण्याचा प्रवास इलेक्ट्रिक बसने करता येणार आहे. इलेक्ट्रिक बससेवेसाठी चार्जिंग स्टेशनच्या उभारणीलाही गती दिली जात आहे.