उद्धव ठाकरेंची तोफ आज औरंगाबादेत धडाडणार..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण शक्तिनिशी पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे प्रकरणामधील पुढचा टप्पा म्हणून औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये राजकारणाला मिळालेल्या राजकीय वळणानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज (बुधवारी) होणार असून आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
सत्तेमध्ये प्रमूख पदी असणाऱ्या शिवसेनेची ताकद दाखविण्याच्या दृष्टीने तसेच पक्ष संघटन बांधणीचा एक भाग म्हणून मागील १५ दिवसामध्ये सुमारे १५०० पेक्षा जास्त बैठका घेण्यात आलेल्या असून क्रीडांगणापासून ते भाजी बाजारातसुद्धा सभेला येण्याची पत्रके वाटण्यात आलेली आहेत. त्यामुळे या सभेला औरंगाबाद शहरातून तब्बल १ लाख मतदार उपस्थित राहणार असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान मराठवाडय़ामधील शिवसेना नेत्यांच्या बैठका मा. खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतलेल्या आहेत. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची ताकद या सभेतून दाखविण्याचा प्रयत्न आज बुधवारी होणार आहे.