शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ आमदार नॉटरिचेबल..

महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत असून विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमधील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याची बातमी मिळत आहे.

शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी होती. त्यातच आता त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे तब्बल १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिंतेमध्ये आणखीच वाढ झाली असून मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली.

काल सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत शिवसेनेची सुद्धा मते फुटली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरूनच आता शिवसेनेतच फूट पडणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील काही काळ नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत असून एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच “नॉट रिचेबल” असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांना मोबाईलवर संपर्क केल्यावर गुजराती भाषेमधील डायलर टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.

१३ आमदार संपर्का बाहेर असल्याची कुणकुण लागताच लगेच वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपासच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर हजेरी लावली. ही बैठक मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरूच होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आज पुन्हा होणार बैठक

मध्यरात्री वर्षावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली असून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. आता या बैठकीमध्ये किती आमदार हजेरी लावतात यावर महाविकास आघाडीचं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेमधली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा वर्षावर या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

Similar Posts