आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमकुलीचा व्हिडीओ व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडीओ आहे अकोल्याच्या कृषीनगर भागामधील पंचशील नगरातील रहिवाशी असलेल्या पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण करतोय आणि त्याच वेळी त्याचे कृत्य त्याची चिमकुली मुलगी पाहत आहे. मनिष कांबळे असे या नराधम पतीचे नाव असून तो पत्नी संगिताला मारहाण करीत असून तिचे तोंड दाबत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
अनेक वर्षांपासून वाद; पत्नीला जीवे करण्याचा प्रयत्न
मनीष कांबळे व त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. मनिषने संगिताला अंधारात ठेवून दुसरे लग्न केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मागील तीन दिवसांपूर्वी दुपारी मनिषने संगिताला अमानुषपणे मारहाण करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता संगीताची मुलगी ”आईला मारू नको ना बाबा….!,” अशा प्रकारची विनवणी करीत असताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. व्हिडीओ मध्ये तिचा चेहरा दिसत नाही.
आरोपी मनिष कांबळे विरोधात अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी मनीष कांबळे याला न्यायालयात हजर केले. जिल्हा सत्र न्यायाल्याने त्याला जामीन मंजूर केला आहे.