औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक जप्त..
ई-बाईकमध्ये बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक RTO कार्यालयाकडून जप्त करण्यात आल्या असून यातील पाच ई-बाईक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तपासणीसाठी देण्यात येणार आहेत.
पर्यावरणपूरक ई-बाईकचा बोलबाला सुरु झाल्यावर काही ठिकाणी ई-बाईक्सला आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. ई-बाईक्समध्ये मूळ क्षमतेपेक्षा आणि बेकायदेशीर पणें अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून आणि अन्य बदल करुन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आगीच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अशा बेकायदेशीर बदलांमुळे ई-बाईक्सना आग लागून अपघाताच्या घटना होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परिवहन आयुक्तांनी राज्यभरात ई-बाईक्सच्या उत्पादक, वितरकांकडे आणि रस्त्यावर चालणाऱ्या ई-बाईक्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यव्यापी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली व आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी औरंगाबाद, जालना आणि बीड अशी तीनही जिल्ह्यात ई-बाईक्स तपासणीचे आदेश दिले होते.
त्या आदेशानुसार औरंगाबाद शहरात २३, २४ मेरोजी तपासणी मोहिम राबवण्यात आली. आरटीओच्या पथकाने विविध १२ विक्रेत्यांकडील व रस्त्यावर धावणाऱ्या ३९ ई-बाईक्सची तपासणी केली असता तपासणीमध्ये १२ ई-दुचाकी या नमूद क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या असल्याचे आढळून आल्या. यामध्ये ७ वाहने ही विक्रेत्यांकडेच सिल करुन ठेवण्यात आली. तर इतर ५ वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात आणण्यात आली.
आता या वाहनांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे श्री. मेत्रेवार यांनी सांगितले.