73 लाख पेन्शनधारकांसाठी Good News, लवकरच मिळणार ही सुविधा..!
Employees Provident Fund Organisation : या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत EPFO केंद्रीय पेन्शन प्रणालीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. याद्वारे 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यावर एकाच वेळी पेन्शन पाठवता येईल. सध्या ते 138 क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या वेळी पाठवले जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली आणणार आहे. या महिन्याच्या अखेरीस 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत त्याच्या स्थापनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या प्रणालीच्या स्थापनेमुळे, देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन एकाच वेळी हस्तांतरित केली जाऊ शकते.
सध्या EPFO (Employees Provident Fund Organisation) ची 138 प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन हस्तांतरित करतात. अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला पेन्शन मिळते. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 29 आणि 30 जुलै रोजी होणार्या EPFO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) च्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला जाईल. ही प्रणाली बसविल्यानंतर 138 क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल.
पेन्शन काढण्याची अंतिम मुदत
वृत्तानुसार, पेन्शन काढण्याची किमान मुदत 6 महिन्यांवरून कमी करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मांडला जाणार आहे. याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधीमध्ये 6 महिन्यांपेक्षा कमी योगदान दिले असले तरीही तो त्याची रक्कम काढू शकतो. सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत योगदान द्यावे लागते.
माहिती केंद्रीय डेटाबेसमध्ये हस्तांतरित केली जाईल
20 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या CBT च्या 229 व्या बैठकीत, विश्वस्तांनी केंद्रीकृत IT आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसकडे हस्तांतरित केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि पुरवठा सुलभ होईल. केंद्रीय प्रणालीतून डी-डुप्लिकेशनची सोय केली जाईल आणि एखाद्या कर्मचाऱ्याची कंपनी बदलताना खाते हस्तांतरित करण्याच्या त्रासातून सुटका होईल.