मोबाईल चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत असताना लागला विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू.
मोबाईल चार्जिंगवर लावून बोलत असताना विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याने मृत्यू झाला असावा. सदरील तरुण हा मुंबई येथील रहिवासी होता आणि फर्निचरचे काम करण्यासाठी इंदूर येथे आला होता.
मोबाईल चार्जवर लावून कुणाशी बोललात तर सावध व्हा, अपघात होऊ शकतो. अशीच एक घटना इंदूरमध्ये घडली असून त्यात एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्ज करत असताना तो पत्नीशी बोलत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली. इंदूरच्या विक्रम हाइट्समध्ये ही घटना घडली असून सुजित हृदयनारायण विश्वकर्मा (25) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुजितचा भाऊ संजय याने सांगितले की, ते मुंबई मधील नालासोपारा येथील रहिवासी असून फर्निचर बनवण्याचे काम करतात. सुमारे आठवडाभरापूर्वी शोरूममध्ये फर्निचर बनवण्याचे काम करण्यासाठी ते इंदूर येथे आले होते. रात्री सुजीतने संजयकडे मोबाईल चार्जर मागितला व तो दुसऱ्या खोलीत गेला. मोबाईल चार्जिंगला लावून तो त्याच्या पत्नीशी बोलू लागला. इतक्यात त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला, त्याचा आवाज ऐकून खोलीत गेल्यावर तो बेशुद्ध अवस्थेत होता. मोबाईल चार्जिंगला लावून तो बोलत असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याने सुजितच्या मेंदूची रक्तवाहिनी फाटली, त्यामुळे मृत्यू झाला.
सुजीतचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. संध्याकाळी फर्निचरचं काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जायचा प्लॅन होता, रात्री जेवण झाल्यानंतर सुजितने पत्नीशी मोबाईलवर बोलणे सुरू केले. यादरम्यान हा अपघात झाला.