पत्नी पीडित पुरुषांनी पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा म्हणत चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा..

औरंगाबाद : बायकोच्या जाचाने त्रस्त असलेल्या पुरुषांनी, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चक्क पिंपळाच्या झाडाला उलटे फेरे मागत माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको अशी प्रार्थना केली.

सोमवार दि 13 रोजी वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करून महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.

सात जन्मच काय सात सेकंद सुद्धा अशी भांडकुदळ बायको नको – पुरुषांनी दिल्या घोषणा

पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा पत्नी पीडित पुरुषांनी केली. या बरोबरच पुढील सात जन्मच काय सात सेकंद सुद्धा अशी भांडकुदळ बायको नको, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पिंपळाच्या वृक्षाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन सुध्दा केले आहे. तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा सदर पुरुषांनी निषेध देखील केला.

वट सावित्रीच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन:

मंगळवारी वट सावित्री पौर्णिमा असून या दिवशी महिला वट वृक्षाची पूजा करून सात जन्म हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, आपल्या भांडकुदळ बायकोची इच्छा पूर्ण करू नको यासाठी वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पत्नी पिडित पुरुषांनी यमराजाला व मुंजाला साकडे घालत म्हटले की, हे मुंजा आमच्या बायकांनी आम्हाला एवढा त्रास दिला आहे की, अशा पत्नीबरोबर सात जन्म काय, अवघ्या सात सेकंद देखील संसार करू शकत नाहीत.

आमच्या बायकांनी आमच्या कुटुंबाचा छळ करून आम्हाला असह्य वेदना दिल्या आहेत. अशा बायका उद्या सावित्री-प्रमाणे वट वृक्षाची पूजा करून यमराजाला साकडे घालतील. ते साकडे योग्य नाही म्हणून आमच्या भांडकुदळ पत्नीचे उद्या काही एक म्हणणे ऐकू नकोस. व आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरुपी मुंजा (अविवाहितच) ठेव, अशी मनोकामना यावेळी संघटनेतील पुरुषांनी करत पिंपळाला १०८ उलट्या प्रदक्षिणा घातल्या…

महिलांप्रमाणे पुरुषांसाठी कायदे करण्याची मागणी:

पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना नेहमीच कायद्याचे झुकते माप असल्यामुळे अनेक महिला या कायद्याचा गैरवापर करत पुरुषांवर अन्याय करीत असतात. त्यामुळेच, आम्हा पुरुषांना आत्महत्या करण्याची वेळ येते. शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन पुरुषांकरीता पुरुष आयोग समिती स्थापन करावी आणि पुरुषांची बळी थांबवावी..

मागील 7 ते 8 वर्षांपासून पत्नी पिडीत आश्रमामध्ये पिंपळ पौर्णिमा साजरा करण्यात येते. यावेळेस पत्नी पिडीत पुरुष… “हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका देऊन मरणयातना देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव असे साकडे पिंपळाच्या झाडाला घालतात.

औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीवपीडित पुरुष आश्रम नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या त्रासपासून त्रास्त असलेल्या नव-यांना मदत करण्याचे काम करते.

Similar Posts