अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ सिल्लोड मध्ये रॅली; आम्ही एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेमध्ये आलो, आणि त्यांच्यासोबतच राहणार..

काँग्रेस सोडल्यावर तब्बल आठ महिने कोणताही पक्ष नव्हता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आलो होतो. ते दोघे जे घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही नेहमी एकनाथ शिंदे सोबतच राहणार, असा खुलासा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष आणि अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र अब्दुल समीर यांनी सिल्लोड मध्ये आयोजीत रॅली आणि सभेला संबोधीत करत असताना केला. अब्दुल सत्तार यांनी सभेला येता आले नाही मात्र त्यांच्या भावना मी आपल्या पर्यंत पोहचवीत आहे असेही ते म्हणाले..

एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्याकरीता सिल्लोड शहरामध्ये आज रविवारी दुपारी 12 वा. शिवसेना भवन येथून रॅली काढण्यात आली, या रॅलीचा समारोप नीलम चौकामध्ये झाला. यावेळेस शिवसेनेचे काही पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, विविध गावातील सरपंच-उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

सिल्लोडमध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन..
यावेळी अब्दुल समीर यांच्या नेतृत्वामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शांततेने ही रॅली काढण्यात आली. मात्र या रॅली व सभेत कुणावरही टीका करण्यात आली नाही. तसेच रॅलीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हवामान प्रतिकूल असल्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोडला येता आले नाही, असा खुलासा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळेस केला. अब्दुल समीर म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही नेते विकास निधी देताना दुजा भाव करत असल्यामुळे विकास काम करण्यास अडथळे निर्माण होत होते. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी दिला. शिंदे नेहमी सुख-दुःखात सर्व आमदारांच्या पाठीशी उभे होते. यामुळेच मोठ्या संख्येने आमदार त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

अब्दुल सत्तार हे स्व-संघर्षातुन निर्माण झालेले नेते

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अब्दुल सत्तार यांनी राजकारणाची सुरुवात करून थेट केबिनेट व राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. आम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरणार नाही, यापुढे जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जाऊ. जनता आमच्या पाठीशी आहे. यावेळी सिल्लोड शहर, ग्रामीण, अजिंठा येथील पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, सीताराम मेहेत्रे, अजित विसपुते,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी एसआरपीची एक तुकडी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Similar Posts