सावधान..! विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..
आपलं शरीर सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असणं अत्यंत महत्वाचं आहे. भाज्यांनीच आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या शरीराला आवश्यक तितके प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळतात. मात्र काही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या सेवनाने आपल्याला विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते.
कोणत्या आहेत त्या भाज्या आणि कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..
अनेक दिवस पालेभाज्यांमध्ये मेथी, फळ-भाज्यांमध्ये दुधी, पडवळ, भोपळा, काकडी अशा काही भाज्यांच्या सेवनामुळे लोकांना अन्नातून विषबाधा होत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र ही विषबाधा होण्यामागची कारणे काही नैसर्गिक आहेत तर काही रासायनिक आहेत. त्यातील नैसर्गिक कारण म्हणजे, घरी आणलेली काकडी कधी कधी अगदीच कडू लागते. त्याचप्रमाणे दुधी भोपळा, भोपळा, पडवळ, दोडकी या भाज्या देखील खाताना कधीतरी कडू लागतात. या फळभाज्यांच्या वेलीला गाईचं किंवा इतर जनावरांच तोंड लागलं असेल, असं म्हटलं जातं. ते वैज्ञानिक दृष्ट्याअगदी खरं आहे. या फळभाज्यांच्या वेलीला काही इजा झाल्याने म्हणजे गुरांकडून वेल तोडली गेल्याने, ओरबाडल्याने संपूर्ण वेलीत तिच्या मुळामध्ये कुकुर्बिटासीन हे द्रव्य तयार होतं. त्यामुळे त्यावेलीला येणारं प्रत्येक फळ हे कडूचं येतं. फळभाज्यातील या कडवटपणामुळेच आपल्याला अन्नातून विषबाधा होते.
दुसरं रासायनिक कारण म्हणजे शेतात भाज्या पिकवताना त्याच्या झटपट वाढीसाठी रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो किंवा संरक्षणासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात किटक नाशकांची फवारणी केली जाते म्हणून भाज्यांमध्ये आपल्या शरीरासाठी घातक असे विषयुक्त घटक निर्माण होतात आणि अशा भाज्यांच्या सेवनाने आपल्याला विषबाधा होते.
विषबाधा होऊ नये म्हणून काय करावे
१. आपल्याला विष बाधा होऊ नये म्हणून घरी आणलेल्या कोणत्याही भाज्या या पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा वापर करावा. कारण वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, अनेक जण भाज्या पाण्याने व्यवस्थित न धुता जेवणात वापरतात त्यामुळे त्यावरील कीटकनाशकांचं औषध न निघाल्याने अन्नातून आपल्याला विषबाधा होते.
२. बऱ्याचदा आपण स्वस्त या शब्दाच्या मोहात पडतो आणि भाज्या खरेदी करतो. या स्वस्त भाज्या जास्तकरून भाजीच्या मोठ्या मंडईतून फेकलेल्या असतात. विक्रेते त्याच भाज्या उचलून त्यांना स्वच्छ करुन कमी किंमतीत विकतात. मात्र अशा भाज्यांच्या सेवनाने देखील आपल्याला विषबाधा होते.
३. काकडी, दुधी, पडवळ, दोडका या भाज्या कडू असतील तर त्याच्या सेवनाने विषबाधा होते म्हणून त्या शिजवण्याआधी त्याचा मधला तुकडा किंचित खाऊन बघावा. लगेचच त्याची भाजी बनवून खाऊ नये. डॉक्टर सांगतात की, कारलं सोडून इतर फळभाज्यांमध्ये कडूपणा नसतो त्यामुळे दुधी, भोपळा यांसारख्या भाज्या कडू लागल्या तर त्याचं सेवन करू नये. त्या वाया जातील म्हणून जबरदस्ती खाऊ देखील नये. कारण एखाद्या तुकड्याने आपल्याला विषबाधा होत नाही मात्र कडू लागूनही जास्त प्रमाणात भाज्या खाल्याने विषबाधा होते.
विषबाधा झाल्यावर काय लक्षणं दिसतात
जर आपण अशा भाज्या अतिप्रमाणात खाल्या तर आपल्याला अपचन, मळमळणे, गरगरणे अशी काही लक्षणे दिसुन येतात. जेव्हा अशी लक्षणं दिसून येतील तेव्हा अधिक वेळ न दवडता किंवा घरगृती औषधाचा पर्याय न निवडता त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा.
आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही वेळीच सावध करण्यासाठी हा लेख पाठवायला विसरु नका.