मुलीच्या लग्नानंतर वडिलांनी केली आत्महत्या..! नेमके काय घडले..?
औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील साजापूर गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आज (मंगळवारी) सकाळी मुलीच्या लग्नानंतर दोन दिवसांनी वडिलांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.समीर चांद शहा (वय 45, रा. बाजारपट्टा साजापूर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की, समीर शहा यांच्या मुलीचे शुक्रवारी साजापूरच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील तरुणाशी लग्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर लग्नाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी मुलीचे सासरी वलीमा (रिसेप्शन) होते. त्या कार्यक्रमाला समीर आणि त्यांचे कुटुंबीय ढोरकीन येथे उपस्थित होते.
वलिमाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे घरी परतले. लग्नातील धावपळीच्या थकव्यामुळे सर्वजण झोपी गेले. सकाळी समीर शाह हे घरात न दिसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल लागत नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांनी समीर यांचा खूप शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाही.
दरम्यान, मंगळवारी सकाळी काही नागरिकांना समीरचा मृतदेह साजापूर येथील तलावात तरंगताना दिसला. तलावात मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून समीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि पुढील तपासासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.