Army Recruitment : तरुणांसाठी मोठी बातमी! लवकरच सुरू होणार सैन्य भरती..

Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. सरकार सैन्य दलातील रखडलेली भरती लवकरच पुन्हा सुरू करणार आहे. मात्र, सरकार यावेळी भरतीकरीता नवीन योजनेवर काम करत आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’च्या धर्तीवर ही योजनेचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्या दलात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

सैन्य भरती-बाबत प्राप्त माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला लष्करी व्यवहार विभाग सध्या या भरतीसाठी एका नवीन योजनेवर काम करत असून लवकरच या आराखड्याचा मसुदा तयार करून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे, व त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यावर लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. सैन्यातील ही भरती ‘अग्निपथ‘ या नावाने ओळखली जाणार, तर सैनिकांना ‘अग्नीवीर‘ असे नाव देण्यात येणार आहे.

गेल्या काही काळापासून कोरोना महामारीचे संकटामुळे अनेक सरकारी भरती थांबल्या आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांपासून नवीन सैन्यभरती देखील झालेली नाही. दरम्यान, संरक्षणराज्य मंत्री अजय भट्ट यांनी या वर्षाच्या सुरूवातीला संसदेमध्ये एका प्रश्नला उत्तर देताना गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही अशी माहिती दिली होती. त्याबरोबरच सैन्यभरतीसोबतच हवाई दल आणि नौदलांची भरती देखील थांबवण्यात आलेली आहे. मात्र, दोन वर्षांपासून सैन्य भरती थांबवलेली असल्यामुळे भरतीसाठी तयारी तरणाऱ्या तरूणांमध्ये संताप असून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवडणूक रॅलीत आपला विरोध व्यक्त केला आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील रखडलेली सैन्य भरती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

चार वर्षात होणार निवृत्ती

नविन योजनेप्रमाणे ही सैन्यभरती चार वर्षांसाठी असणार असून चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यामधील काही सैनिकांची सेवा वाढवली जाण्याची शक्यता आहे. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षे केलेल्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. मात्र चार वर्षांच्या निवृत्तीनंतर सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करता येणार

विशेष म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म व प्रदेशानुसार भरती होणार नसून सदरील भरती भारतवासी म्हणून होणार आहे. म्हणायचे झाल्यास कोणत्याही जाती, धर्म व प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतील. आणि या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!