औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेला 16 अटींसह परवानगी! काय आहेत नेमक्या अटी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली असून येणाऱ्या ८ जून २०२२ रोजी औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
८ जूनला खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मागील अनेक दिवसांपासून सभेच्या तयारीला लागले आहेत. शहर पोलिस आयुक्तांनी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याकडे हे परवानगी पत्र दिलं असून त्यामध्ये सभेसाठी १६ अटी घालण्यात आल्या आहेत.
▪️सभेपूर्वी संबंधित आयोजनासाठीचे ‘स्टेज स्टॅबिलिटी ‘ प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेऊन ते सिटी चौक पोलिस ठाण्यात सादर करावे.
▪️सदर सभा ८ जून रोजी ०४ ते ९:३० या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे वेळ व ठिकाणात बदल करू नये.
▪️या सभेसाठी कोणताही रस्ता बंद करण्यात येवू नये. अथवा वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
▪️ सभेला येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. जाताना किंवा येताना घोषणाबाजी, हुल्लडबाजी करू नये.
▪️सभेसाठी वाहतुकीचे घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं.
▪️सभेसाठी बोलावण्यात आलेल्या वाहनांना तशा योग्य सूचना द्याव्यात. आयोजकांनी सभेच्या ठिकाणी किंवा नंतर कोणतीही ऱॅली काढू नये.
▪️कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी इत्यादी बाळगू नये. त्याचं प्रदर्शन करू नये.
▪️वरील अटी नागरिकांना कळवण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
▪️कार्यक्रमस्थळी स्वयंसेवक नेमावेत. त्यांची नावे, मोबाइल क्रमांक तसेच येणाऱ्या नागरिकांची अंदाजे संख्या, वाहनांची अंदाजे संख्या याची माहिती एक दिवस आधी पोलीस निरीक्षक, सिटी चौक यांना द्यावी.
▪️सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. गर्दीत गोंधळ, चेंगराचेंगरी झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
▪️सभास्थानी पोलिसांनी निर्देशित केल्या प्रमाणे बॅरीकेट्स असावेत. प्रत्येकाची सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना राहील.
▪️सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ध्वनीच्या मर्यादेचं पालन व्हावं.
▪️सभेच्या वेळी शहर बससेवा, अँब्युलन्स , दवाखाना, मेडिकल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणपवळण यांना बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
▪️सभेच्या ठिकाणी वापरण्यात येणारी ध्वनीक्षेपण यंत्रणा, वीज यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करू घ्यावी.
▪️कार्यक्रमाच्या ठिकाणी सुसज्ज अँब्युलन्स ठेवावी.
▪️कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची जबाबदारी संयोजकांवर असेल.
▪️वरील अटींचं उल्लंघन झाल्यास त्यासाठी सर्व संयोजक जबाबदार असतील.