बस चालवताना ड्रायव्हरला आली फीट, प्रवासी महिलेने सांभाळलं स्टेअरिंग….
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अनेक महिला आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसच्या चालकाला फीटचा झटका आला. यानंतर बसमध्ये चढणाऱ्या 45 वर्षीय महिलेने समजूतदारपणा दाखवत स्टेअरिंग पकडले आणि सुमारे 10 किलोमीटरपर्यंत बस चालवत सर्वांना सुरक्षित स्थानी पोहचवले.
७ जानेवारीला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
योगिता सातव असे या बस चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे. योगिता आणि इतर महिला आणि मुले पिकनिक आटोपून पुण्यातील शिरूर येथील कृषी पर्यटन केंद्रातून मिनीबसमध्ये येत होते. अचानक चालकाला फीटचा झटका आल्याने त्याने बस रस्त्याच्या मधोमध थांबवली. मुले आणि महिला घाबरू लागल्यावर योगिता पुढे आली आणि बसचे स्टेअरिंग ताब्यात घेतले.
योगिताने बस सुमारे 10 किमी चालवली आणि ड्रायव्हरला रुग्णालयात नेले. योगिता यांना या बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘मला कार कशी चालवायची हे माहित आहे, म्हणून मी बस चालवण्याचा निर्णय घेतला. पहिली पायरी म्हणजे ड्रायव्हरला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेणे. म्हणून मी बस जवळच्या रुग्णालयात नेली आणि त्याला तिथे दाखल केले.
10 किमी चालवून ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या योगिताने बसमधील इतर प्रवाशांनाही आपल्या घरी नेले. खराब परिस्थितीत घाबरण्याऐवजी बुद्धिमत्तेचा वापर आणि धैर्य दाखवल्याबद्दल लोक योगिताचे कौतुक करत आहेत.