उसनवार पैश्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर भागातील घटना..
शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर येथे सुमारे १० वर्षांपूर्वी घेतलेल्या उसनवार पैश्यांच्या वादातून एक जणाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सांयकाळी घडली असून नंदु दगडु नागरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, नंदु नागरे यांनी १० वर्षांपूर्वी गल्ली मध्येच राहणाऱ्या रवी उमेश गायकवाड याच्याकडून १० हजार रूपये उसनवार घेतले होते. या पैशाच्या कारणावरून त्यांचे नेहमी वाद होत होते. याच कारणावरून शनिवारी संध्या. ५:१५ च्या सुमारास रवी गायकवाड व त्याचे तीन साथीदार हे नागरे याच्याकडे असलेले पैसे मागण्यासाठी गेले असता नंदु नागरे यांनी सांगितले की, मी तुझे संपूर्ण पैसे दिलेले आहेत. तरी तु मला पैसे का मागतो. या कारणावरून वाद झाला. या वादातून रवी गायकवाड, व त्याचे साथीदारांनी नागरे यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच नंदु यांना दोन्ही पायावर, मांडीवर व कमरेवर लोखंडी रॉडने मारुन जखमी करत कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नागरे यांच्या पत्नी व मुलीला सुद्धा रवी गायकवाड व त्याच्या साथीदारांनी धक्का बुक्की केली. याप्रकरणी नंदू नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दशरत खोसरे हे करीत आहे.