औरंगाबादेत तडीपार गुंडाचा धुमाकुळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर..
औरंगाबाद शहर पोलीस हद्दीमधील वाळूज परिसरात पुन्हा एकदा गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत पाहायला मिळाली. एक तडीपार गुंड सामन्यांकडून वसुली करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून पैसे मागणे आणि पैसे न देणाऱ्या लोकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यामधील एक आरोपी तडीपार असल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवार दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास चार गुंडानी प्रताप चौकालगतच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना धमकावत पैसे मागण्यास सुरूवात केली. आणि ज्यांनी पैसे देण्यास विरोध केला त्या नागरिकांना मारहाण सुद्धा केली. एवढेच नाही तर या गुंडांनी तीन नागरिकांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहे. या गुंडांमध्ये एक तडीपार गुंडही असल्याचे दिसून आले असून तोच या टोळीचा मुखिया असल्याचे बोलले जात आहे.
या टोळीचा म्होरक्या असलेला गुंड प्रशांत उर्फ सोनू संपतराव आमटे (वय २१ रा. साईनगर, सिडको, महानगर वडगाव कोल्हाटी ) नामक गुंडाला सहा महिन्यांपूर्वीच दोन वर्षे तडीपार करण्यात आले होते. तडीपार असून सुद्धा तो या भागात बिनधास्त वावरत असतो. नागरिकांकडून पैसे वसूल करून त्यांना मारहाणही करत असतो.