आता LPG कनेक्शन महागले; नव्या ग्राहकांसह उज्ज्वला लाभार्थींना बसणार फटका..
LPG Connection Price: जर तुम्ही नवीन LPG गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच धक्का देणारी आहे. होय, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती नवीन गॅस कनेक्शनच्या किमतीत वाढ केली आहेत.
यापूर्वी LPG गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता नवीन कनेक्शन घेण्यासाठी तब्बल 750 रुपये जास्त म्हणजेच 2200 रुपये द्यावे लागणार आहे.
दोन सिलिंडरसाठी द्यावी लागणार 4400 रुपये सुरक्षा रक्कम
पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलो वजनाच्या LPG गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर 750 रुपयांनी वाढ केली आहे. जर तुम्ही दोन LPG गॅस सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला 1500 रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच, याकरीता तुम्हाला 4400 रुपये सिक्युरिटी रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. यापूर्वी 2900 रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल उद्या दिनांक 16 जूनपासून लागू होणार आहे.
रेग्युलेटरसाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत
त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की, 5 किलोच्या सिलेंडरची सिक्युरिटी ठेव आता 800 ऐवजी 1150 करण्यात आलेली आहे.
उज्ज्वला योजनेला सुद्धा महागाईचा फटका
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या नव्या दरांमुळे ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनसाठी दुप्पट सिलिंडर घेतल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सिक्युरिटी ठेव जमा करावी लागेल. मात्र, एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास त्याला आधीप्रमाणेच सिलिंडरची सिक्युरिटी ठेव द्यावी लागणार आहे.
जाणून घ्या कसे आहेत दर.
▪️विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत- रु-1065
▪️सिलेंडरसाठी सुरक्षा रक्कम- रु. 2200
▪️रेग्युलेटरसाठी सुरक्षा- रु.250
▪️पासबुकसाठी –25 रुपये
▪️कनेक्शन पाईपसाठी–150 रु.
….त्यामुळे नवीन कनेक्शन 3690 रुपयांना मिळणार
जर तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्याकरिता गेलात, तर त्याकरिता तुम्हाला 3690 रुपये मोजावे लागणार आहे. शिवाय गॅस शेगडी घेतल्यास तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. LPG च्या वाढत्या कनेक्शनच्या किमतीमुळे लोक हैराण झाले आहेत.